जळगावात बड्या राजकीय नेत्याची 25 लाखांची रोकड जप्त?

  जळगावातील शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी एका व्यक्तीकडून 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली. या रोकड संदर्भात संबंधित व्यक्तीने योग्य ती माहिती न दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद हिरामण पवार (वय 51, रा. तामसवाडी, ता. पारोळा) असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 500, 200 तसंच 100 च्या नोटांची सुमारे 25 लाख रुपयांची रोकड जप्त केलीआहे

. ही रोकड तो एका निळ्या रंगाच्या हॅन्डबॅगमध्ये घेऊन जात होता. जळगाव शहरातील बोहरा गल्ली परिसरात गस्तीवर असलेल्या शनिपेठ पोलिसांच्या पथकाने त्याला अडवलं. बॅगेत काय आहे अशी विचारणा केल्यावर त्याने मी शेतकरी आहे. माझ्याकडे खूप शेती आहे. मी जळगावात सोने घ्यायला आलेलो होतो. असं कारण सांगितलं. परंतु त्याच्या ताब्यात असलेल्या रोकड संदर्भात त्याने पोलिसांना ठोस माहिती दिली नाही. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शनिपेठ पोलीस ठाण्यात आणलं.

प्रमोद पवार या व्यक्तीची सखोल चौकशी सुरू आहे. त्याने एवढी रक्कम कुठून आणली, ही रक्कम तो कुठे घेऊन जात होता, या संदर्भातील माहिती घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात मोठी रक्कम बाळगण्यास प्रतिबंध असल्याने, या कारवाईची माहिती शनिपेठ पोलिसांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या भरारी पथकाला दिली. ही रोकड याचं पथकाकडे देण्यात येणार असल्याचेही रंगनाथ धारबळे यांनी सांगितले

दरम्यान, शनिपेठ पोलिसांनी जप्त केलेली पंचवीस लाख रुपयांची रोकड ही जळगावातील एका बड्या राजकीय नेत्याची असल्याची चर्चा आहे. त्या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *