तिसऱ्या दिवशी थंडीचा कडाका; पुण्यात किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस.

पुण्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पहाटे कडाक्याची थंडी, दुपारी गारा वारा आणि संध्याकाळी पुन्हा गारठा, असेच वातावरण अनुभवायला मिळते आहे. वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे शुक्रवारीदेखील पुण्यात थंडीची लाट कायम होती. शहरात सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. येत्या सोमवारनंतर थंडीची लाट ओसरेल, तापमानात टप्प्याटप्याने वाढ होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.


हिवाळ्याची सुरुवात झाल्यानंतर आलेल्या थंडीच्या पहिल्या लाटेने पुण्यासह मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भातील नागरिकांना सध्या हुडहुडी भरली आहे. पुण्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पहाटे कडाक्याची थंडी, दुपारी गारा वारा आणि संध्याकाळी पुन्हा गारठा, असेच वातावरण अनुभवायला मिळते आहे.

बोचऱ्या वाऱ्यांपासून बचावासाठी नागरिक दिवसभर स्वेटर, जॅकेट घालून फिरत आहेत, तर रात्री शहराच्या वेगवेगळ्या भागात शेकोट्या पेटवलेल्या दिसत आहेत. मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांमध्येही तापमानाचा पारा घसरला आहे. हवेली आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी परिसरामध्ये किमान तापमान ८ अंशापर्यंत खाली आला आहे. पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहणार असून, सोमवारनंतर गारठा कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नाशिक/छत्रपती संभाजीनगर राज्यातील शहरांच्या तापमानाचा पारा सातत्याने खाली येत असताना नाशिक शहरात गुरुवारी किमान १०.५ तर कमाल २७.४ तापमानाची नोंद करण्यात आली. निफाडचा पारा गुरुवारी पहाटे अवघ्या ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात थंडीचा कडाका वाढला आहे. शहरात शुक्रवारी १०.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *