राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकांनी संभ्रम वाढवला. शिंदेंच्या मनात चाललंय काय? भाजप, शिवसेना.

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी संपन्न होणार आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा शपथविधी आज आझाद मैदानात होईल. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे शपथ घेणार का, याबद्दल संभ्रम कायम आहे.

 महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी संपन्न होणार आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा शपथविधी आज आझाद मैदानात होईल. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे शपथ घेणार का, याबद्दल संभ्रम कायम आहे. त्यातच तिन्ही पक्षांच्या निमंत्रण पत्रिकांनी हा संभ्रम आणखी वाढवला आहे. शिंदेंच्या मनात नेमकं चाललंय का, असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.

मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे गृह मंत्रालयासाठी प्रचंड आग्रही आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना गृह खात्यासाठी अडून बसली आहे. देवेंद्र फडणवीस काल रात्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. तेव्हाही शिंदेंनी फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रालयाची मागणी केली. गृह खातं मिळणार असेल तरच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारु, अशी अटच त्यांनी घातली. त्यावर दिल्लीतील पक्ष नेतृत्त्वाशी बोलून निर्णय घेऊ, असं उत्तर फडणवीस यांनी शिंदेंना दिलं. आज होणाऱ्या शपथविधीसाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांनी निमंत्रण पत्रिका वाटल्या आहेत. शिवसेना, भाजपच्या पत्रिका भगव्या रंगाच्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसची निमंत्रण पत्रिका गुलाबी रंगाची आहे. भाजप, शिवसेनेच्या पत्रिकेत देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा असा उल्लेख आहे. दोन्ही पत्रिकांमध्ये उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी असाही उल्लेख आहे. दोन्ही पत्रिकांवर देवेंद्र फडणवीस यांचं नाव नमूद करण्यात आलेलं आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या नावाची उल्लेख करण्यात आलेला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा असा उल्लेख आहे. या पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचा उल्लेख नाही. तिन्ही निमंत्रण पत्रिकांवर शिंदे यांचं नाव नसल्यानं ते आज शपथ घेणार नाहीत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिंदे यांचं नाव पत्रिकेवर का नाही, असा प्रश्न विचारण्यात आला असता, पत्रिका आधीच छापण्यात आलेल्या आहेत, असं उत्तर देण्यात आलं. शिंदे यांनी काल फडणवीस, अजित पवारांसोबत पत्रकार परिषद घेतली. त्यातही त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीबद्दल ठोस असं काहीच सांगितलं नाही. त्या पत्रकार परिषदेच्या आधीच निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या असल्यानं शिंदे यांचं नाव त्यात नाही, असा खुलासा करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *