उबाठा गट निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार : देवेंद्र फडणवीस

उबाठा गट निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार : देवेंद्र फडणवीस

जळगाव – हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, काँग्रेससोबत जेव्हा युती करायची वेळ येईल तेव्हा मी शिवसेनेचे दुकान बंद करेल. मात्र त्यांच्या मुलाने काँग्रेससोबत युती केली. एवढच काय तर निवडणुकीनंतर ते काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे झालेल्या महायुतीच्या सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले, हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, ज्यावेळेस काँग्रेससोबत युती करण्याची वेळ येईल त्यावेळेस शिवसेनेचे दुकान बंद करेन मात्र त्यांच्या मुलाने काँग्रेससोबत नुसती युतीच नाही केली तर निवडणूकी नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची टीका त्यांनी केली. ज्यांचे अस्तित्वच उरले नाही, ते आपल्यासमोर उभे आहेत अशीही टीका त्यांनी केली.

फडणवीस यांनी यावेळी भाजपसोडून शिवसेना ठाकरे गटात गेलेल्या माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावरही निशाणा साधला. त्यांचे तिकीट का कापले यावर त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. त्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की नेमकी काय चुक झाली ते. खरं म्हणजे त्यांचे तिकीट कापून त्यांना वाचवले आहे. नाहीतर ते ज्या मार्गाने चालले होते त्या मार्गापासून आम्ही त्यांना परावृत्त केले आहे. यापेक्षा अधिक बोलणे उचित होणार नाही असेही फडणवीस म्हणाले.

ही निवडणूक साधीसुधी निवडणूक नाही देशाला नेता निवडण्याची निवडणूक आहे. देशाचे भवितव्य ठरवण्याची निवडणूक आहे.

 

दुसरीकडे 24 पक्षांची खिचडी

निवडणुकीत दोन पर्याय मतदारांसमोर आहे. विकासाकडे नेणारे मोदी म्हणजे महायुती आहे. तर, दुसरीकडे राहुल गांधी गांधीच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी आहे. तिथे कोणीच कोणाला नेता मानायला तयार नाही. तर महायुती म्हणजे विकासाची ट्रेन आहे. महायुतीच्या ट्रेनचे इंजिन आणि बोगी सबका साथ सबका विकास करणारी आहे. दुसरीकडे राहुल गांधींचे इंजिन आहे, त्याला बोगीच नाही. या देशांमध्ये प्रथम आदिवासी महिलेला राष्ट्रपती करणारे मोदींसारखे नेतृत्व आहे. ज्यांनी आदिवासी नेतृत्वाला प्राधान्य देऊन संविधानाच्या सर्वोच्च पदावर बसविल्याचे फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *