दिल्ली सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय; आयुष्मान भारत योजनेला मंजुरी.

रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रिपदाची व प्रवेश साहिबसिंह वर्मा यांच्यासह अन्य सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सायंकाळी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला दिल्ली विधानसभा निवडणुकीत यंदा मिळालेला बहुप्रतीक्षित शानदार विजय भाजपने गुरुवारी ऐतिहासिक रामलीला मैदानाच्या साक्षीने साजरा केला. रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रिपदाची व प्रवेश साहिबसिंह वर्मा यांच्यासह अन्य सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सायंकाळी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मागील ‘आप’ सरकारकडून प्रलंबित ठेवण्यात आलेले १४ कॅग अहवाल विधानसभेत मांडण्याचा निर्णयही घेण्यात आला.मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री गुप्ता व सर्व मंत्र्यांनी यमुनेकाठी जाऊन पूजन केले आणि यमुना नदीची स्वच्छता हाही आपल्या सरकारचा सर्वोच्च प्राधान्यक्रम राहणार असल्याचे अधोरेखित केले. नव्या मंत्रिमंडळात गुप्ता व प्रवेश वर्मा यांच्यासह आशीष सूद, मनजिंदरसिंग सिरसा, रवींद्र इंद्रराज सिंह आणि डॉ. पंकज सिंह यांचा समावेश आहे. नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी या साऱ्यांना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता पदाची व गोपनीयतेची शपथ दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, एनडीएतील एन. चंद्राबाबू नायडू, पवन कल्याण, लल्लनसिंह, एकनाथ शिंदे व अजित पवार हे नेते;

तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री आणि इतर तारांकित नेते, साधू-महंत व सफाई कामगार; तसेच झोपडपट्टी नागरिकांसह रामलीला मैदानावरचा सुमारे पन्नास हजारांचा जमाव रेखा गुप्ता मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरला.कोणाचीही भाषणे न होता या आटोपशीर सोहळ्याची सांगता झाली. त्यानंतर पंतप्रधानांसह सारे नेते रामलीला मैदानावरून निघाले. जंतरमंतर भागातील इम्पिरियल हॉटेलमध्ये पंतप्रधानांनी सारे मुख्यमंत्री व एनडीए नेत्यांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. त्यापूर्वी तेथेच ‘एनडीए’ची बैठकही झाली.दिल्लीतील महिलांना आता दरमहा २५०० रुपये घरबसल्या फुकट मिळण्यासाठी फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आसपास ही रक्कम पात्र महिलांच्या खात्यावर जमा होईल, असे मुख्यमंत्री गुप्ता यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *