निवडणुकीत ‘डबल व्होटिंग’, अकोल्यातील काँग्रेसच्या विजयी आमदाराला नोटीस, विधानसभा निवडणुकीला आव्हान.

अकोला पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे विजयी उमेदवार साजिद खान पठाण यांच्यावर डबल व्होटिंगचा आरोप करण्यात आला आहे. तशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.अकोला पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे विजयी उमेदवार साजिद खान पठाण गैरमार्गाने निवडून आले आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी ‘डबल व्होटिंग’ अर्थात एकाच मतदाराचे दोनवेळा मतदान घडवून आणल्याचा आरोप करणारी व त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी विनंती करणारी याचिका भाजपचे उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली आहे.

या प्रकरणी आज न्यायालयाने साजिद खान पठाण यांना नोटीस बजावली आहे.विधानसभा निवडणुकीचा यंदाचा निकाल अनेकांना मानवलेला नाही. तर काहींना पचलेलाच नाहीये. याचा परिणाम म्हणजे विदर्भातील अशा अनेक पराभूत उमेदवारांनी निवडून आलेल्या आमदाराविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. यात मुख्यत्वे आघाडीच्या तसेच भाजपविरुद्ध लढलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, काँग्रेसच्या विजयी उमेदवाराविरुद्ध केवळ एकच याचिका झाली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार भाजपचे उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी काँग्रेसचे विजयी उमेदवार साजिद पठाण यांच्या विजयाला आव्हान दिले आहे.आज यावर न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणी पठाण यांना नोटीस बजावून १८ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत.

अग्रवाल यांच्याकडून ॲड. रोहन मालविय व ॲड. हरीष ठाकूर यांनी बाजू मांडली.नागपूर खंडपीठात विदर्भातील एकूण २७ पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल केल्यात. यात, ईव्हीएमने निवडणूक घेण्यापूर्वी या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नाही. निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशन निवडणूक आयोगाने काढले नाही, निकालानंतर पराभूत उमेदवारांना सीसीटीव्हीचे फुटेज, फॉर्म नंबर १७ दिले जात नाही. व्हीव्हीपॅटची मोजणीसुद्धा केली जात नाही, असे आरोप करण्यात आलेत. ॲड. आकाश मून व ॲड. पवन डहाट यांच्यामार्फत या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *