१५ मजली ‘सर्जिकल बिल्डिंग’ मार्गी, ८३६ कोटींचा खर्च अपेक्षित, उच्चस्तरीय समितीने दिली मंजुरी.

घाटीतील १५ मजली नवीन सर्जिकल बिल्डिंग प्रस्तावास उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. ही इमारत सध्याच्या मेडिसिन बिल्डिंग व एसएसबी इमारतीला जोडली जाईल आणि सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. प्राथमिक टप्प्यात १०० ते २०० कोटींचा निधी मिळू शकतो.नवीन ‘सर्जिकल बिल्डिंग’ ही सध्याच्या ‘मेडिसिन बिल्डिंग’च्या जवळ असणार आहे. तसेच नवीन इमारतीमागेच ‘एसएसबी’ची इमारत असेल. त्यामुळे नवीन ‘सर्जिकल बिल्डिंग’ ही रुग्णहितासाठी ‘मेडिसिन’ व ‘एसएसबी’च्या इमारतीला ब्रिजद्वारे जोडल्या जाईल. सुमारे दोन ते तीन एकर परिसरात नवीन इमारत असेल, असेही अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

घाटीत मागच्या किमान दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्या जाणाऱ्या व सुमारे ८३६ कोटींचा खर्च अपेक्षित असलेल्या १५ मजली नवीन ‘सर्जिकल बिल्डिंग’च्या प्रस्तावाला मंत्रालयात झालेल्या बैठकीत उच्चस्तरीय समितीने (हाय पॉवर कमिटी) मंजुरी दिली आहे. त्यामुळे या संदर्भात लवकरच शासन आदेश निघणे अपेक्षित असून, असा हा निर्णय घाटीसाठी स्थापनेनंतरचा ऐतिहासिक ठरणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) अपघात विभाग, शस्त्रक्रियागृह, रक्त केंद्र, ‘एनआयसीयू’सह २० पेक्षा जास्त विभागांचा समावेश असलेली सध्याची ‘सर्जिकल बिल्डिंग’ ही ६० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. एकीकडे इमारतीचे आयुष्य संपत आल्याचे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये स्पष्ट झाले आहे, तर दुसरीकडे गत ६० वर्षांत रुग्णसंख्या काही पटींनी वाढल्याने अपुऱ्या जागेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच जुन्या इमारतीमुळे बांधकामातील अनेक आधुनिक सोयी-सुविधांच्या अभावाचा समानाही दररोज शेकडो रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना करावा लागतो आहे.या गैरसोयींमुळेच नवीन ‘सर्जिकल बिल्डिंग’चा विषय गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारकडे सातत्याने मांडला जात आहे. दरम्यान, १७ सप्टेंबर २०२४ रोजी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटीतील कार्यक्रमात ‘सर्जिकल बिल्डिंग’साठी टप्प्याटप्प्याने निधी देण्याचे जाहीर केले व प्रशासनाच्या पुढाकारामुळे ८३६ कोटींचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीपर्यंत पोहोचला;

परंतु सत्तांतरानंतर हा विषय पुन्हा एकदा मागे पडला. त्यानंतर मागच्या काही महिन्यांत घाटीत आलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीम यांच्यासमोरही हा विषय मांडण्यात आला होता.तर, घाटी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरुच होता आणि त्याचाच परिणाम म्हणून मंत्रिमंडळातील बैठकीत उच्चस्तरीय समितीने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता लवकरच या विषयी शासन आदेश निघेल व सुमारे १०० ते २०० कोटींचा निधी प्राथमिक टप्प्यात मिळू शकेल, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.नवीन ‘सर्जिकल बिल्डिंग’ सद्यस्थितीत असलेले बहुतांश विभाग, वॉर्ड, शस्त्रक्रिया गृह, प्रसूती कक्ष, रक्त केंद्र, क्ष-किरण संबंधित सर्व चाचण्यांची सोय व इतर पूर्वीच्या सुविधाही अधिक अद्ययावत पद्धतीच्या असणार आहेच; शिवाय रुग्णांच्या नातेवाईकांसाठी संपूर्ण एक मजला असणार आहे. तसेच नातेवाईकांसाठी उपहारगृहदेखील असेल. इतरही विविध बाबींची सोय या ठिकाणी होणार असल्याने सर्व सुविधा एकाच छताखाली येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *