होळ्या नको, होळी पेटवा! एकत्र येऊन होलिकोत्सव साजरा करा, मुंबई पालिकेचे आवाहन.

प्रत्येक गृहसंकुलांमध्ये होळ्या पेटवण्यापेक्षा ‘एक गाव एक होळी’ या पद्धतीप्रमाणे समाजाने एकत्र येऊन हा सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.राज्यभरात आज, गुरुवारी होलिकोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. शहरांमधील वाढती संपन्नता लक्षात घेता, प्रत्येक गृहसंकुलामध्ये विविध पद्धतीने होळी आणि धुळवडीचा सण साजरा करण्यात येतो. मात्र, होलिकोत्सवाचे पारंपरिक महत्त्व बाजूला पडून, आता केवळ सण साजरा करणे यावरच लक्ष केंद्रीत होत असल्याने प्रत्येक गृहसंकुलांमध्ये होळ्या पेटवण्यापेक्षा ‘एक गाव एक होळी’ या पद्धतीप्रमाणे समाजाने एकत्र येऊन हा सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच प्राणवायू देणाऱ्या झाडांचे, वृक्षांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे उद्यान अधीक्षक जीतेंद्र परदेशी यांनी सांगितले.थंडीच्या पार्श्वभूमीवर पूर्वी होळी पेटवली जायची.

मात्र, आता तापमानही बदलत असून, यामुळे त्या कालावधीसाठी प्रदूषणही वाढू शकते. या पार्श्वभूमीवरही समाजाने एकत्र येऊन ‘एक गाव, एक गणपती’ सारख्या संकल्पनांप्रमाणे सामूहिक पद्धतीने सण साजरे करण्याची गरज व्यक्त होत आहे. यामुळे होळी पेटवल्याने होणारे प्रदूषणही नियंत्रणात येऊ शकेल.होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारे बेकायदा वृक्षतोड करू नये. तसे झाल्याचे आढळून आल्यास, याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असे मुंबई महापालिकेच्या वतीने कळवण्यात येत आहे. या सणाच्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्य आढळल्यास, सतर्क नागरिकांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना व स्थानिक पोलिस ठाण्यास कळवावे किंवा महापालिकेच्या ‘१९१६’ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन महापालिकेचे उद्यान अधीक्षक तथा वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सचिव जितेंद्र परदेशी यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे किंवा झाड तोडण्यास कारणीभूत होणे, हा अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिला कमीत कमी रुपये एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यासह एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा देखील होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *