पती-पत्नीने अवघ्या दीड एकरात घेतलं ६५ टन कलिंगडाचे विक्रमी उत्पादन, केली लाखोंची कमाई.

 नांदेडमध्ये शेतकरी पती-पत्नीने कलिंगडाचं तब्बल ६५ टन उत्पन्न घेतलं असून यातून लाखोंची कमाई केली आहे. या दांम्पत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.शेती मालातून काही मिळत नाही, नोकरी नाही, व्यवसायाला भांडवल नाही अशी ओरड होतं असते, मात्र नांदेड जिल्ह्यातील एका शेतकरी जोडप्याने अवघ्या दीड एकर शेतीत कलिंगडाचे ६५ टन इतके विक्रमी उत्पादन घेऊन किमया केली आहे. या कलिंगड विक्रीतून त्यांनी सहा लाख रुपयाचे उत्पन्न देखील मिळवले आहे. नायगांव तालुक्यातील शेळगांव छत्री इथल्या सागरबाई सालेगावे आणि दिलीप सालेगावे असे या शेतकरी जोडप्याचे नाव आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा माल नांदेडमधून केरळ राज्यात निर्यात झाला आहे. या जोडप्याच्या यशाचं, त्यांनी केलेल्या मेहनतीतून केलेल्या यशस्वी शेतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे शेळगाव छत्री येथील सागरबाई सालेगावे आणि त्यांचे पती दिलीप सालेगावे हे सुशिक्षित दांम्पत्य आहे. सागरबाई या बारावी उत्तीर्ण, तर दिलीप हे ही बीए उत्तीर्ण आहेत. अनेक लोक घरची शेती सोडून नोकरीच्या शोधात शहराकडे वळतात. मात्र नोकरीच्या मागे न लागता सालेगावे या पती – पत्नीने शेतीची कास धरली आहे. आपल्या दीड एकर जमिनीमध्ये त्यांनी कलिंगडाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. कृषी अधिकाऱ्यांकडून कलिंगड उत्पादनाबाबत माहिती देखील घेतली. दीड एकरमध्ये कलिंगडाची लागवड करून त्यांनी ६५ टन उत्पन्न मिळवलं आहे. यातून त्यांनी सहा लाख रुपयाचे उत्पन्न मिळवलं आहे.सालेगावे या पती – पत्नीने पिकवलेले कलिंगड व्यापारी महबूब शेख यांनी दहा रुपये किलो प्रमाणे कलिंगड खरेदी करून केरळ राज्यात निर्यात केले. उन्हाळा आणि त्यातच मुस्लिम बांधवाचा रमजान महिना सुरु असल्याने बाजारात कलिंगडला चांगली मागणी आहे. बाजारात २० रुपये किलो प्रमाणे कलिंगड विक्री होते आहे.

राज्यात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र खचून न जाता शेतऱ्यांनी शेतीमध्ये मेहनत करून काम केलं, तर चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं हेच सालेगावे दांम्पत्याने करून दाखवले आहे. त्यांचा हा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शेळगाव छत्री येथील सागरबाई सालेगावे आणि दिलीप सालेगावे यांच्या मेहनतीचे पंचक्रोशीत कौतुक होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *