सर्वसामान्यांना मोठा दिलासा, तब्बल २१ महिन्यांनी खाद्यपदार्थांच्या किंमती घसरल्या.

जानेवारीमध्ये महागाई दर ४.३१ टक्के होता. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये भारताचा महागाई दर ३.६१ टक्क्यांवर घसरला असून हा दर सात महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे.सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सरकारने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये भारताचा महागाई दर ३.६१ टक्क्यांवर घसरला आहे. हा घसरलेला दर मागील सात महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. जानेवारीमध्ये हा दर ४.३१ टक्के इतका होता. किरकोळ महागाई दर सात महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला असून खाद्यपदार्थांच्या, खाण्या-पिण्याच्या वस्तूच्या किमती मागील २१ महिन्यांतील सर्वात कमी स्तरावर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार फेब्रुवारीमध्ये महागाईचा दर ३.९८ टक्के असेल. खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली घसरण हे महागाई कमी होण्याचे मुख्य कारण असल्याचं सांगण्यात आलं आहे. ग्राहक किंमत निर्देशांकात अर्थात कंज्यूमर प्राइस इंडेक्स (CPI) मध्ये अन्नपदार्थांचा, खाण्या-पिण्याचा वाटा जवळपास निम्मा आहे. जानेवारीमध्ये ५.९७ टक्के असलेला अन्न महागाई दर फेब्रुवारीमध्ये कमी होऊन ३.७५ टक्क्यांवर घसरला आहे.अधिकृत आकडेवारीनुसार, फेब्रुवारी मधील अन्नधान्य महागाई मे २०२३ नंतर सर्वात कमी आहे. भाज्यांच्या महागाईचं प्रमाणही कमी झालं आहे.

जानेवारीत भाजीपाल्याच्या दरात ११.३५ टक्के, तर फेब्रुवारीत केवळ १.०७ टक्के वाढ झाली होती. धान्याच्या किमती ६.१० टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर जानेवारीत ही वाढ ६.२४ टक्के इतकी झाली होती. त्याशिवाय डाळींच्या किमतीत ०.३५ टक्क्यांनी घट झाली असून गेल्या महिन्यात २.५९ टक्क्यांची वाढ झाली होती.आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) फेब्रुवारीमध्ये सांगितलेलं, की खाद्यपदार्थांच्या किमती घसरल्याने महागाईचा दर कमी झाला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात महागाई आणखी कमी होईल. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे. आरबीआयचं काम महागाई दर २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान ठेवणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *