शिक्षक रसा तळाला गेला आहे काय?. शिवराम पाटील

शिक्षक रसा तळाला गेला आहे काय?.

शिक्षण हे ज्ञानदानाचे पवित्र क्षेत्र म्हणतात. लहान होतो तोपर्यंत ऐकून घेत होतो. पण आता जेंव्हा कळायला लागले,तेंव्हा शिक्षण म्हणजे काय? शाळा म्हणजे काय? शिक्षण संस्था म्हणजे काय? हे खूप जवळून पाहिले.भयंकर वास्तव समोर आले. शिक्षण संस्था मिळाली कि कारखाने,दारू दुकाने बंद करून हा धंदा चालवणे जास्त फायदेशीर ठरले आहे.ज्याच्याकडे शिक्षण संस्था आहे तो आता संस्थानिक पेक्षा उच्च दर्जाचा राजा आहे.जरी लोक त्याला चेअरमन म्हणत असले तरी तो चोरमन म्हणून जास्त प्रसिद्ध झाला आहे.


जर कॉलेज, अमळनेर प्रताप कॉलेज सारखी,एम जे सारखी,नूतन मराठा सारखी नामांकित असेल तर प्रोफेसर भरतीचे चक्क ९० प्रति शिक्षक दर आहे. १०० शिक्षक प्रोफेसर पैकी दरवर्षी १० रिटायर झाले तरीही भरतीचे डोनेशन चा गुणाकार करा.निम्मा दर कारकून आणि पाव दर सिपाई ची भरतीचा असतो.बरे!,यात देणारा इतका प्रसन्न असतो कि तो कोणत्याही इडी किंवा पीएमएलए टिम किंवा एटीएस ला ही कबूल करीत नाहीत. म्हणून नरेंद्र मोदी येथे हात घालत नाहीत.हात घातला तर मोठे मासे सापडतील .नव्हे ! व्हेल, शेल मासे सापडतील. शिक्षण खाते भारत स्वतंत्र झाल्यानंतर निर्माण केले आहे.यात कोणताही कायदा नाही. फक्त नियम आहेत.ते पाहिजे तसे उलट सुलट बदलता येतात.त्यामुळे टरबूज कापला किंवा मेला तरीही न्याय चाकूला मिळतो. तो टरबूज म्हणजे शिक्षक. चाकू म्हणजे शिक्षण संस्थेचा चेअरमन. इतर व्यवसायात वस्तू विकून पैसा मिळतो. काही ठिकाणी सेवा देऊन पैसा मिळतो. पण येथे व्हकेंशी विकून पैसा मिळतो.म्हणजे रिकामी जागा विकून पैसा मिळतो.विश्वातील हे वेगळे गणित आहे.पोकळी विकून पैसा मिळवणे म्हणजे हा आधिभौतिक व्यवसाय आहे. वस्तू नाही सेवा नाही. त्यामुळे जी एस टी नाही.दिल्या घेतल्याची हाग नाही, बोंब नाही.देणारा घेणारा दोन्ही पापी असल्याने कोणीच कोणाचे पापावर फोकस मारत नाहीत.शेती, नोकरी, व्यापार, कारखाना , राजकारण पेक्षा हा शिक्षण संस्था चालवण्याचा उद्योग खूप फायदेशीर आहे. या व्यवसायात जो पडला तो पुढे आमदार खासदार होतोच. मंत्री होतो. शिवाय मेल्यावर त्याचा पुतळा शाळा कॉलेज च्या प्रांगणात उभारला जातो. त्यावर लिहीलेले असते.” शिक्षण महर्षी”. “शिक्षण सम्राट”.  वगैरे वगैरे. त्या पूतळ्याच्या सावलीत सर्व पापे अंतर्धान पावतात. दारू दुकान समोर कोणाचाही पुतळा उभारला जात नाही.


आता शिक्षकांचा प्रतिनिधी आमदार विधानपरिषदेवर निवडून देण्याचा हंगाम आहे.यात गरीब, प्रामाणिक माणसाने पडू नये. कारण लोकसभा पेक्षा यात मतदार संघ मोठा असतो.  खर्च ही मोठा असतो.शिक्षक हाच मतदार असतो. एकही शिक्षक भुका प्यासा ठेवत नाहीत. प्रत्येकाला पैसा आणि रस्सा मिळतोच. आज सकाळी माझ्याकडे एका शिक्षकाने तक्रार केली.काका, मला पैसा मिळाला. रस्सा मिळाला. पण बोटी नाही मिळाली. म्हणे माझी फसवणूक झाली. मला कुटुंबासहित मटणाचे कुपन मिळाले.  पण पाहातो तो फक्त रस्सा मिळाला.  शिक्षक इतका रसातळाला गेला आहे काय?

शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *