जळगाव – आसोदा- मन्यारखेडा रस्त्यावरील दूरदर्शन टॉवर मागील शेती परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्याभरात शेती साहित्याच्या चोरीचे सत्र सुरू आहे. सोमवारी प्रदीप भोळे यांच्या डाळिंबाच्या बागेतील ३० हजार किमतीचे जनरेटचे आर्मेचर चोरट्यांनी लांबवले. यासह पीव्हीसी पाइप, लोखंडी अँगलही चोरून नेले. आठवड्याभरात ही चौथी घटना आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील शेती अवजारे, पाइप, विहिरीतील मोटार, इलेक्ट्रिक वायरच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात शेतकरी गटातर्फे पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचेही भोळे यांनी सांगितले. मन्यारखेडा रोडवरील रेल्वे बोगदा वाहतुकीसाठी बंद केला असल्याने चोरीचे प्रमाण वाढले आहे. यासह डाळिंब बागेतील याच जनरेटरचे आर्मेचर चोरट्यांनी लांबवले आहे.
या भागात प्रेमीयुगुलांचे प्रमाणही वाढले असून ते अश्लील चाळे करतात. शेतकऱ्यांनी विरोध केला असता त्यांना दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून केल्या जात आहे. पोलिस यंत्रणेने या भागात गस्त घालून यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.