समाजमाध्यमांतील पोस्टमुळे मिळाली एक कोटींची देणगी!

पुणे : अमेरिकेतील सुनील आणि साधना शेणॉय या दाम्पत्याकडून विद्यार्थी साहाय्यक समितीला ९५ लाख २५ हजार रुपयांची (एक लाख १५ हजार डॉलर्स) देणगी दिली. गेल्या वर्षीही त्यांनी ६२०० डॉलर्सची देणगी दिली होती. समाजमाध्यमांतील पोस्टद्वारे प्रभावित होऊन या दाम्पत्याने समितीला देणगी दिली.

ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या पुण्यातील निवास, भोजन, व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थी सहायक समिती गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. समितीचे विश्वस्त डॉ. मकरंद फडके आणि शेणॉय समाजमाध्यमाद्वारे जोडलेले आहेत. डॉ. फडके यांच्या समाजमाध्यमातील पोस्टमधून शेणॉय यांना समितीच्या कामाची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी ६२०० डॉलर्स देणगी दिली. जानेवारीमध्ये पुण्यात आल्यावर शेणॉय यांनी मुलींसाठी वसतिगृहाच्या बांधकामस्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी आणखी एक लाख डॉलर्सची देणगी देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानुसार त्यांनी १ लाख १५ हजार डॉलर्सची देणगी दिली.समाजमाध्यमातून समितीला सुमारे एक कोटी रुपयांची मदत मिळाल्याचा आनंद आहे. समितीच्या समाजाभिमुख कामाची ही पावती आहे. शेणॉय दाम्पत्य आणि डॉ. मकरंद फडके यांचे समिती आभार मानत आहे, अशी भावना समितीचे विश्वस्त तुकाराम गायकवाड यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *