भाजपबाबत विरोधकांचा अपप्रचार; काँग्रेस राजवटीत ८० घटनादुरुस्त्या; विनोद तावडे यांचे प्रत्युत्तर

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’ची घोषणा दिल्याने भाजपला संविधान बदलायचे आहे, असा विरोधकांचा अपप्रचार सुरू आहे. मात्र तशी सुतराम शक्यता नसून काँग्रेसच्या कार्यकाळात ८० वेळा घटनादुरुस्ती झाली, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी येथे केले.

देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा आहे, असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले होते. साधनसंपत्तीवर वंचितांचा नाही, तर अल्पसंख्याकांचा पहिला अधिकार आहे, या भूमिकेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबरोबरच उद्धव ठाकरे, शरद पवार यांचाही पाठिंबा आहे का, असा सवाल तावडे यांनी केला. राज्यात विरोधकांकडून ‘नाची’ आणि अन्य असभ्य व वाईट भाषेत प्रचार सुरू असून हे वेदनादायक व खेदजनक असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारची कामगिरी, जनहिताचे झालेले निर्णय आणि सध्याची राजकीय परिस्थिती याविषयी तावडे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. तावडे म्हणाले, गोव्यासाठी देशाची राज्यघटना लागू करू नये, अशी मागणी काँग्रेस आमदाराने केली असून कर्नाटकमधील काँग्रेस आमदारानेही तसेच वक्तव्य काही काळापूर्वी केले होते. काँग्रेस नेत्यांची भूमिका काय आहे, हे यावरून दिसून येत आहे. मात्र भाजपने घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिल रोजी त्यांच्या प्रतिमेला वंदन करुन निवडणूक वचननामा जाहीर केला. मोदी सरकारने संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाजपला राज्यघटना बदलायची आहे, अशा विरोधकांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही.

महाराष्ट्र पुरोगामी असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, विलासराव देशमुख, शरद पवार अशा नेत्यांनी प्रदीर्घ काळ एकमेकांवर जोरदार टीका केली. पण भाषेची पातळी कधी घसरली नाही.

मोदी सरकारने महाराष्ट्रातील जनतेसाठी काय केले, हे विरोधकांनी पाहिले पाहिजे. यूपीए सरकारच्या कार्यकाळापेक्षा मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राला करांमध्ये वाटा आधीच्या तुलनेत ३३ टक्के अधिक मिळाला, तर अनुदानात २५३ टक्के वाढ झाली. केंद्राने महाराष्ट्राला ११ हजार ७११ कोटी रुपये बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिल्याने अनेक प्रकल्पांना त्याचा उपयोग होत आहे.महायुतीतील प्रत्येक पक्षाला त्यांच्या ताकदीप्रमाणे जागा मिळतील आणि जागावाटप लवकरच मार्गी लागेल. कोणाला किती जागा द्यायच्या व कोण उमेदवार असेल, हे आमचे ठरले असून योग्य वेळी ते जाहीर होईल, असे तावडे यांनी नमूद केले. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच भाजपमध्ये येतील, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *