नवी दिल्ली- खासदारांच्या शपथविधीवेळी तेलंगणमधील हैदराबादचे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईन अशी घोषणा दिल्याने वादाला तोंड फुटले. ओवेसी यांनी उर्दूमधून शपथ घेतल्यानंतर जय भीम, जय मीम, जय तेलंगण अशा घोषणांनंतर पॅलेस्टाईनचाही जयघोष केल्याने संसदेतील भाजप खासदारांनी आक्षेप नोंदविला.
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की, संसदेच्या सदस्यत्वाच्या शपथविधी दरम्यान अशा पद्धतीने अन्य देशांचा जयघोष करणे हे चुकीचे असून सभागृहाच्या नियमांना डावलून करण्यात आलेले कृत्य आहे.
दरम्यान, ओवेसी यांनी मात्र त्यांनी दिलेल्या घोषणेचे समर्थन केले असून यात काहीही गैर आणि घटनाबाह्य नाही असा दावा केला आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांनी पॅलेस्टाईन बदल काय लिहिले आहे हे आक्षेप घेणाऱ्यांनी आधी वाचावे असे सुचवले आहे.
संसद सदस्य होण्यासाठी पहिली अट भारतीय नागरिक असण्याची आहे. याशिवाय त्या व्यक्तीने विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रति खरी श्रद्धा आणि निष्ठा राखली पाहिजे. असे असताना ओवैसी यांनी दुसऱ्या देशाचे नाव घेतले त्यामुळे हे नियमांचे उल्लंघन असू शकते. सध्याच्या नियमानुसार, ओवेसींनी दुसऱ्या देशाप्रती निष्ठा दाखवली असल्याने त्यांचे संसद सदस्यत्व अयोग्य ठरवले जाऊ शकते.
भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १०२ मध्ये संसद सदस्याला अपात्र ठरवण्याच्या तरतुदी आहेत.
१. तो भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये लाभाचे पद धारण करत असल्याचे आढळले तर त्याचे सदस्यत्व अपात्र ठरवले जाऊ शकते
२. मानसिक स्थिती ठीक नसल्यास आणि कोर्टाने त्याला अनफिट ठरवल्यास खासदारकी जाऊ शकते
३. दिवाळखोर (स्वत:चे कर्ज न फेडू शकत असल्यास) झाला असल्यास खासदाराला अपात्र ठरवता येते
४. तो भारताचा नागरिक राहिला नसल्यास किंवा त्याने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्विकारले किंवा दुसऱ्या कोणत्या देशाप्रति निष्ठा दाखवली तर तो अपात्र ठरू शकतो
५ संसदेच्या एखाद्या कायद्याअंतर्गत त्याला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर
चौथ्या पॉईंटमध्ये स्पष्ट आहे की, एखादा खासदार दुसऱ्या देशाप्रति निष्ठा दाखवतो, त्याचे संसद सदस्यत्व अपात्र ठरवले जाऊ शकते. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय कारवाई होते हे पाहावं लागेल.