नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदानही बुधवार, २० नोव्हेंबरला घेतले जाणार आहे. येथे काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना होत आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक (मे-२०२४) निवडणुकीत नांदेडमधून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. अवघ्या तीनच महिन्यांत २६ ऑगस्टला वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून डॉ. संतुकराव हंबर्डे रिंगणात आहेत. एकूण १९ उमेदवार रिंगणात असून काँग्रेस व भाजपतच लढत आहे.  सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे लोकसभा आणि सहाही जागांवर एकच निवडणूक चिन्ह राहणार आहे. २०१९ ला येथे भाजपचे प्रतापराव चिखलीकर विजयी झाले होते. नांदेड लोकसभा कार्यक्षेत्रात ६ आमदार असून ५ महायुतीकडे आहेत. भोकर व देगलूरचे काँग्रेस आमदार भाजपात गेले आहेत. एक आमदार काँग्रेसकडे आहे. काँग्रेस उमेदवाराला सहानुभूती मिळते की भाजप ही जागा पुन्हा आपल्याकडे घेते हे पाहणे महत्वाचे ठरते. नांदेडला २५ वर्षांनंतर लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *