सत्तास्थापनेचा तिढा कायम; नेमकं चाललंय काय? एकनाथ शिंदेंच्या आजच्या सगळ्या बैठका रद्द;

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस गावी गेल्यानं सत्ता स्थापनेची प्रक्रिया मंदावली. काल गावाहून परतलेले एकनाथ शिंदे यांच्या आज महत्त्वाच्या बैठका होत्या. ठाणे: राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस गावी गेल्यानं सत्ता स्थापनेची प्रक्रिया मंदावली. काल गावाहून परतलेले एकनाथ शिंदे यांच्या आज महत्त्वाच्या बैठका होत्या. पण त्या सगळ्या रद्द करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. शिंदे यांची प्रकृती अद्याप पूर्ण बरी नाही. त्यामुळे ते आज त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत. ते आज कोणालाही भेटणार नाहीत. ५ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल, असं भाजपकडून जाहीर करण्यात आलं आहे. पण मुख्यमंत्रिपदापासून अन्य खात्यांचा तिढा कायम आहे. त्यात शिंदेंनी आजच्या सगळ्या बैठका रद्द केल्यानं चर्चा पुन्हा एकदा रखडली आहे.

एकनाथ शिंदे गेल्या आठवड्यात दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही होते. सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा झाली. शिंदे यांनी शहांशी स्वतंत्र चर्चादेखील केली. बैठक सकारात्मक झाल्याचं शिंदेंनी सांगितलं. त्यानंतर ते मुंबईत परतले. यानंतर मुंबईत महायुतीच्या पुढील बैठका होणार होत्या. मात्र ३० नोव्हेंबरला शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी अचानक निघून गेले. शिंदे आराम करण्यासाठी तिथे गेल्याचं सांगण्यात आलं.

गावी गेल्यानंतर शिंदेंची प्रकृती बिघडली. डॉक्टरांच्या पथकानं त्यांच्यावर उपचार सुरु केले. यानंतर १ डिसेंबरला एकनाथ शिंदे ठाण्यात परतले. सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार भाजप नेतृत्त्वाला दिले असल्याचा पुनरुच्चार त्यांनी दरे गावातून निघताना केला. सत्ता स्थापनेत माझा कोणताही अडसर नाही. भाजप नेतृत्त्वाचा निर्णय मला आणि माझ्या शिवसेनेला मान्य असेल, असं शिंदे म्हणाले. गावातून निघताना त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. महायुतीत समन्वयचा अभाव नसल्याचं त्यांनी ठासून सांगितलं.

आज मुख्यमंत्री ठाण्यात आहेत. ते त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. शिवसेनेच्या आमदारांची बैठक शिंदे आज घेणार होते. पण शिंदे यांची प्रकृती पाहता बैठक होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आज महायुतीची महत्त्वाची बैठक प्रस्तावित होती. एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी चर्चा करणार होते. पण ही बैठक होण्याची शक्यताही अतिशय कमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *