मुंबईत पुन्हा हिट अँण्ड रन, भरधाव टँकरने २५ वर्षीय अभिनेत्रीला उडवलं, जागीच मृत्यू; चालक फरार

अभिनेत्री आणि मॉडेल शिवानी सिंहचा मुंबईत रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. ती तिच्या मैत्रिणीसोबत बाईकवरून जात होती. नक्की कसा झाला अपघात जाणून घेऊ. मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. वांद्रे परिसरात एका २५ वर्षीय मॉडेलचा भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने धडक देताच चिरडून मृत्यू झाला. मॉडेल शिवानी सिंह तिच्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरून जात असताना समोरुन येणाऱ्या टँकरने त्यांना धडक दिली. अपघातानंतर टँकर चालक फरार झाला आहे.

वांद्रे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. तेव्हा भरधाव वेगाने येणारा पाण्याचा टँकर समोरून आला आणि त्याची दुचाकीला धडक झाली. शिवानी बाईकवर मागे बसली होती. टक्कर होताच तिने जागची उडाली आणि टँकरच्या चाकाखाली आली. आजूबाजूच्या लोकांनी तिला तात्काळ भाभा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. टँकर चालकाने उडी मारून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. चालकाचा शोध सुरू आहे. चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. शिवानी सिंहच्या करिअरला नुकतीच सुरुवात झाली होती. अलीकडेच, तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी मिळाली, शिवानीने लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला. तिच्या आयुष्यातील हा पहिला आंतरराष्ट्रीय शो होता. बिग बॉस ओटीटी-२ ची स्पर्धक आशिका भाटियानेही शिवानीच्या मृत्यूबद्दल पोस्ट केली आहे. शिवानी तिची मैत्रीण होती.

वांद्रे परिसरातच शनिवारी आणखी एक हिट अँड रन प्रकरण पाहायला मिळाले. एका पोर्श कारने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ४ दुचाकींना धडक दिली. एक १९ वर्षांचा मुलगा पोर्श कार चालवत होता, कारमध्ये त्याचे मित्रही होते. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. अलीकडच्या काळात मुंबईत हिट अँड रनच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये मुलुंडमध्ये एका ट्रक चालकाने स्कूटरला धडक दिली होती, त्यात ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जुलै महिन्यात मुंबईच्या वरळी भागात बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली होती, त्यात एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि तिचा पती जखमी झाला होता. यात शिवसेनेच्या माजी नेत्याचा मुलगा मिहीर शाह याला रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *