केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक गुड न्यूज: आता तेजस, वंदे भारतसाठीही मिळणार LTC लाभ.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना फिरण्यासाठी दर वर्षी मिळणाऱ्या ‘लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन’ (एलटीसी) योजनेअंतर्गत तेजस, वंदे भारत आणि हमसफरसारख्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये नियमांनुसार प्रवास करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. आठवा वेतन आयोग स्थापन करण्यापाठोपाठ केंद्र सरकारने आपल्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदवार्ता दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना फिरण्यासाठी दर वर्षी मिळणाऱ्या ‘लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन’ (एलटीसी) योजनेअंतर्गत तेजस, वंदे भारत आणि हमसफरसारख्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये नियमांनुसार प्रवास करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना ‘एलटीसी’ योजनेअंतर्गत विविध ठिकाणी ये-जा करण्यासाठी तिकिटाच्या खर्चाची संपूर्ण परतफेड सरकारकडून मिळते. कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या काळात त्यांच्या गावी किंवा पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी अधिक सोयीस्कर आणि जलद प्रवासासाठीचे आरामदायी पर्याय प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) म्हटले आहे. या योजनेचा लाभ घेऊन राजधानी, शताब्दी आणि दुरांतो गाड्यांव्यतिरिक्त या प्रीमियम गाड्याही कर्मचारी वापरू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

‘एलटीसी’ योजनेअंतर्गत सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दोन पर्यायमिळतात. यानुसार चार वर्षांच्या कालावधीत दोनदा त्यांच्या गावी भेट दिल्याबद्दल तिकिटाच्या किमतीची परतफेड मिळू शकते. दुसरा पर्याय म्हणजे दोन वर्षांनी एकदा त्यांच्या गावी भेट देणे आणि उर्वरित दोन वर्षांत भारतातील कोणत्याही ठिकाणी सुट्टीवर जाणे आणि त्या सहलीच्या तिकिटांच्या किमतीचा परतावा सरकारकडून घेणे. वातानुकूलीत, एक्सप्रेस व प्रीमियम रेल्वेगाड्यांतूनही ‘एलटीसी’धारकांना सवलत मिळावी, यासाठी अनेक सरकारी संघटना आणि कर्मचाऱ्यांच्या विनंतीनंतर ‘डीओपीटी’ने हा निर्णय जाहीर केला. त्यापूर्वी ‘डीओपीटी’ने अन्य विभागाशी सल्लामसलत करून नवीन नियमही तयार केले आहेत. राजधानी एक्सप्रेस, शताब्दी आणि दुरांतोसारख्या काही प्रीमियम गाड्या आधीच या योजनेत समाविष्ट होत्या; परंतु, अलीकडेच सुरू झालेल्या तेजस आणि वंदे भारत गाड्या या योजनेच्या व्याप्तीबाहेर होत्या.या योजनेनुसार १२ व्या आणि त्यावरील स्तरावरील कर्मचाऱ्यांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी परतावा मिळणाऱ्या प्रीमियम रेल्वे प्रवासाचा लाभ घेता येईल. ६ ते ११ स्तरांपर्यंतच्या श्रेणींतील कर्मचारी वातानुकूलित प्रवासाचा लाभ घेऊ शकतात. पाचव्या आणि त्याखालील स्तरांवरील कर्मचाऱ्यांना एलटीसी दरम्यान तृतीय वर्ग वातानुकूलित डब्यांतून प्रवासाचा लाभ घेता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *