अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ प्रदर्शित झाल्यापासून काही ना काही घटना घडत आहे. हैदराबाद इथं दोन प्रेक्षकांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबईत आता धक्कादायक प्रकार घडलाय. ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटाच्या प्रीमिअर शोदरम्यान बुधवारी रात्री हैदराबादमधील एका चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला; तर तिच्या १३ वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर आता मुंबईतही एक धक्कादायक घटना घडली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार पुष्पा २ चा शो सुरू असताना वांद्रे इथल्या गॅलेक्सी थिएटरमध्ये अज्ञात व्यक्तीनं विषारी गॅस फवरल्याचं समोर आलं आहे. या विषारी गॅसमुळं सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांना अचानक खोकला येऊ लागला, अनेकांना उलट्या झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर सिनेमाचा शो १५-२० मिनिटांसाठी थांबवण्यात आला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी थिएरटरची तपासणी केली आहे. या सिनेमागृहात आलेल्या एका प्रेक्षकानं तिथं काय घडलं ते सांगितलं. सिनेमाचा मध्यंतर झाल्यानंतर हा प्रकार घडला होता. इंटर्व्हल नंतर अनेकजण थिएटरमधून बाहेर गेले होते. पण जेव्हा पुन्हा प्रेक्षक थिएटरमध्ये आले तेव्हा त्यांना असा काही प्रकार घडल्याचं लक्षात आलं. त्यानंतर काही काळ सिनेमाचा शो थांबण्यात आला. हा गॅस जर अती विषारी असता तर अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.