जळगाव शहरातील लोक टाइम्स न्युज चे पत्रकार विक्रम कापडणे हे महानगर पालिकेत बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता यांचा कॅमेरा हिसकावून घेणे व त्यातील मेमरी कार्ड काढणे, दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून लोकशाहीचा आवाज दाबनाऱ्या मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद रूले यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह जळगाव शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.
पत्रकार विक्रम कापडणे हे जळगाव महानगरपालिकेच्या लेखा विभागाच्या बाहेर कॅमेऱ्याने शूटिंग करत असताना, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे तेथे आले आणि त्यांनी त्यांचा कॅमेरा जबरदस्तीने हिसकावून घेतला एका कर्मचाऱ्याजवळ दिला आणि त्यातील मेमरी कार्ड काढून घेतले. त्यानंतर महानगरपालिकेतून निघून जळगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी विक्रम कापडणे यांनी सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात तक्रार क्रमांक: ७२३/२०२४ कायदेशीर कलम: कलम ११५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात, विशेषतः सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शूटिंग करणे कायदेशीर आहे. सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना याबाबत माहिती दिल्यानंतरही त्यांनी अरेरावी केली व अधिकाराचा गैरवापर करत कॅमेरा काढून घेतला.
या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून सहाय्यक आयुक्तांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकारांसह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. वस्तुनिष्ठ बातम्या या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करत असतात मात्र काही अधिकार्यांकडून सातत्याने पत्रकारांना त्रास दिला जातो. अशाच पद्धतीचा त्रास जळगाव मनपाचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्याकडून संबंधित पत्रकाराला देण्यात आलेला आहे. तरी या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी तसेच यापुढे सर्व कार्यालयांना पत्रकारांना माहिती देण्या संदर्भात नियमावली जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद रूले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.