शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नवीन सरकारवर टीका केली आहे. २० दिवस उलटून गेले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडी लढा सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकार आहे, तब्बल 20 दिवस उलटून गेले तरी अजून पूर्ण मंत्रिमंडळ नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कोणत्याही खात्याचा कारभार नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल होईल म्हणेपर्यंत आज 14 तारीख आली आता 15 ला होणार म्हणतात, खरं काय खोटं काय हे मोदी-शाहांना माहित. महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, एवढेच ठरलं आहे. पुढील धोरणात्मक निर्णय बैठकीत ठरतील, असेही दानवे यांनी म्हटले.
हिवाळी अधिवेशनाबद्दल बोलताना अंबादास दानवे म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागा कमी आल्या असल्या तरी जनतेसाठी, महाराष्ट्र हितासाठी आमचा लढा सुरुच राहिल. या सरकारचे पूर्ण वाभाडे निघाले आहेत, जे काढायचे ते सभागृहात सांगू. हे दोन अडीज वर्षे सरकार होते ते शेतकरी विरोधी सरकार आहे. हे सरकार कशापद्धतीने आले, अजून जनतेलाच कळाले नाही अशा पद्धतीची स्थिती आहे. ज्या पद्धतीने बीडमध्ये एका सरपंचाचा खून झाला. यात सत्ताधारी पक्षाची लोकं सहभागी आहेत, अशी स्थिती आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या मामाचा खून झाला अशा अनेक घटना सरकार आल्यापासून या महाराष्ट्रात सुरु आहेत. सरकारचे मुख्यमंत्री दिल्लीला जाणे, मुंबईला येणे, नागपूरला जाणे एवढेच करतात बाकी या राज्यासाठी काहीही करत नाहीत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.