शाळेविरुद्ध बातमी का छापली? ज्येष्ठ पत्रकार यांना धमकी, १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी) योगेश व्हिरोळकर

शाळेविरुद्ध बातमी का छापली? असे म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा सांज दैनिक लोकोपचारचे संपादक किशोर (काका) रुपारेल यांना त्यांच्या कार्यालयात घुसून १०ते १२ महिला- पुरुषांनी धमकी दिल्याची घटना १४ जून रोजी घडली. याप्रकरणी तक्रारीवरुन खामगांव शहर पोलिसांनी शाळेचे संचालक गोपाल अग्रवाल, महिला प्राचार्यासह १० ते १२ जणांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

खामगांव येथील रहिवाशी सांज दैनिक लोकोपचारचे संपादक किशोर (काका) बाबुभाई रूपारेल वय ७४ यांनी १५ जून २४ रोजी खामगाव शहर पोस्टेला दिलेल्या तक्रारीत ते मागील ३५ वर्षापासून पत्रकारीता करीत आहे. मेनरोडवरील सनी टॉवर्स येथील कार्यालयातून मागील १४ वर्षापासुन सांज दैनिक लोकोपचार प्रकाशित होत आहे. मी संपादक व प्रकाशक म्हणून कार्यरत आहेत. सदर सांज दैनिकात कोणतीही बातमी प्रकाशित करण्यापूर्वी बातमीची सत्यता पडताळण्यासोबतच सखोल शहानिशा केली जाते व खात्रीलायक सूत्राच्या आधारेच बातमी प्रकाशित करण्यात येते. तर सजनपुरी (खामगाव) येथील युगधर्म पब्लिक स्कुलचे संचालक गोपाल बाबुलाल अग्रवाल असून त्याच्या स्कुलमध्ये पुरुष व महिला कर्मचारी आहेत. दरम्यान युगधर्म पब्लिक स्कुल मधील एका शिक्षिकेने ३ मे २४ रोजी शाळेचे संचालक गोपाल बाबुलाल अग्रवाल याचे विरोधात शिवाजी नगर पोस्टेला फिर्याद दिली आहे. शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीत ‘तु मला एकटी भेटत जा…. सोबत कोणाला घेऊन येत जाऊ नको’ असे वाईट उद्देशाने गोपाल अग्रवाल बोलल्याचे शिक्षिकेने फिर्यादीत नमुद केले आहे. याबाबत सुत्रांकडून खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्यामुळे तसेच तक्रारीची प्रत प्राप्त झाल्यानंतर १० जून २४ रोजीच्या सांज दैनिक लोकोपचार मध्ये ‘युगधर्म पब्लिक स्कुल खामगावचे संचालक गोपाल अग्रवाल यांचा शिक्षिकेला शाळेत एकटे भेटण्यासाठी आग्रह’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले आहे. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर १४ जून २४ रोजी दुपारी १.३० ते १.४५ वाजताच्या सुमारास सनी टॉवर्सस्थित सांजदैनिक लोकोपचार कार्यालयात ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक किशोर (काका) रुपारेल हे त्यांचे सहकारी पत्रकार शिवाजी भोसले, राजीव तोटे व संगणक ऑपरेटर पेपर तयार करण्याचे काम करीत असतांना कोणतीही पूर्वसुचना न देता युगधर्म पब्लिक स्कुलच्या प्राचार्या सौ. मंगला महाजन ह्या स्कुलच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसह कार्यालयात येऊन धडकल्या. यावेळी त्यांनी फिर्यादी किशोर (काका) रुपारेल यांचे सोबत वाद घालुन आमच्या शाळेचे संचालक गोपाल अग्रवाल यांच्याबाबत तुम्ही बातमी कशी काय छापली?, त्या बातमीत छळ झालेल्या महिलेचे नाव का टाकले नाही?,

गोपाल अग्रवाल व युगधर्म पब्लिक स्कुल विरोधात बातमी लावण्याची तुमची हिम्मत कशी काय झाली ? असे नानाविध प्रश्न जोरजोराने विचारून व कार्यालयातील टेबल बडवून फिर्यादी किशोर (काका) रुपारेल यांना धमकावत होते. तसेच यानंतर गोपाल अग्रवाल व युगधर्म पब्लिक स्कुल यांच्या विरोधात बातमी लावाल तर याद राखा, अशा धमक्या देत फिर्यादी किशोर (काका) रुपारेल यांच्या अंगावर आल्या. यानंतर फिर्यादी किशोर (काका) रुपारेल यांनी खामगाव शहर पोलिसांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता पोलिस येणार असल्याचे पाहून सर्व महिला व पुरुषांनी काढता पाय घेतला व जातांनाही धमकावले.

सदर प्रकार हा युगधर्म पब्लिक स्कुलचा संचालक गोपाल बाबुलाल अग्रवाल (रागायकवाड हॉस्पीटलजवळ) याने फिर्यादी किशोर (काका) रुपारेल यांचे नुकसान करण्याचे व त्यांच्यावर हल्ला करून मारहाण करण्याच्या उद्देशाने तसेच पत्रकारीतेपासून परावृत्त करण्यासाठी प्राचार्या सौ. मंगला महाजन व महिला-पुरुष कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन सांजदैनिक लोकोपचार कार्यालयात पाठविले होते. त्यामुळे उपरोक्त सर्व लोकांविरूध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे फिर्यादी किशोर (काका) रुपारेल यांनी नमूद केले आहे. ज्येष्ठ पत्रकार तथा किशोर (काका) रूपारेल यांच्या फिर्यादीवरून खामगाव शहर पोलिसांनी शाळेचे संचालक गोपाल बाबुलाल अग्रवाल प्राचार्या सौ. मंगला महाजन व इतर १० अनोळखी व्यक्तीविरूध्द कलम ४ महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७, सहकलम भादंवि ४५२, ३५२, १४३, १०९, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नाचनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गोमासे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *