भाजपची डोकेदुखी वाढणार; जळगावमध्ये सहा जागांवर मनसेचे उमेदवार.

भाजपची डोकेदुखी वाढणार; जळगावमध्ये सहा जागांवर मनसेचे उमेदवार


लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. विधानसभेसाठी मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावर निवडणुकीसाठी तयारीला लागली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची डोकेदुखी राज्यात वाढू शकते.

पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक मुंबईत घेतली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला. या संदर्भात सर्व जिल्हाप्रमुखांना सूचना देण्यात आले आहेत.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि मनसेचे इच्छुक उमेदवार याचा अहवाल पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय होईल. मनसेच्या या निर्णयाचा फटका महायुतीला बसतो की महाविकास आघाडीतील शिवसेना (Shiv Sena) उद्धव ठाकरे यांना बसतो हा उत्सुकतेचा विषय आहे.

जळगाव जिल्ह्यात 11 पैकी सहा मतदार संघात मनसे (MNS) उमेदवार देणार आहे. जळगाव शहर, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल, चोपडा आणि रावेर-यावल या सहा मतदारसंघात पक्षाकडे इच्छुक उमेदवार आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख adv जमील देशपांडे यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यात मनसेचे चार जिल्हाप्रमुख आहेत. यामध्ये जमील देशपांडे, कमलाकर धारू, अनिल वाघ आणि मुकुंदा रोटे चारही जिल्हाप्रमुख यंदा निवडणुकीसाठी उत्सुक आहेत. 2019 मध्ये जळगाव शहरातून ॲड देशपांडे आणि जळगाव ग्रामीण मतदार संघातून मुकुंदा रोटे यांनी उमेदवारी केली होती. मात्र त्यांचा फारसा प्रभाव दिसला नाही.

यंदा ज्या सहा जागांवर उमेदवार देण्यात येणार आहे, तेथे सध्या भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य आहे. त्यामुळे मनसेने उमेदवार दिल्यास भारतीय जनता पक्षाचे डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपचे नेते मनसेच्या या निर्णयाचे कशाप्रकारे स्वागत करतात याची उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *