नाशकात भीषण अपघात. बस पार्क करताना चालकाचं नियंत्रण सुटलं, स्थानकातच तिघांना चिरडलं.

 नाशिकच्या महामार्ग बसस्थानकात फलाट क्रमांक सहाच्या बाजूला एक चौकशी कक्ष आहे. याच चौकशी कक्षाच्या आजूबाजूला बस येऊन उभ्या राहतात. जिल्ह्यातील महामार्ग बसस्थानकात एक भीषण अपघात झाला आहे. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने तीन जण चिरडले गेले आहेत. यात एकाचा मृत्यू झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर बसचालकाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या महामार्ग बसस्थानकात फलाट क्रमांक सहाच्या बाजूला एक चौकशी कक्ष आहे. याच चौकशी कक्षाच्या आजूबाजूला बस येऊन उभ्या राहतात. दि. ६ डिसेंबरच्या रात्री ठरलेल्या वेळेत एक बस बसस्थानकात येऊन थांबत होती. मात्र, याचवेळी बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट चौकशी कक्षाला जाऊन धडकली. या दुर्घटनेत बसने एकूण तिघांना चिरडलं. यातील एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.अपघातग्रस्त बस ही एक महाराष्ट्र परिवहन महामंडळाची इलेक्ट्रिक बस होती. हा अपघात होताच प्रवासी आक्रमक झाले. बस चालकाला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. मात्र प्रवासासाठी निघालेल्या एक प्रवाशाला थेट मृत्यूला सामोरे जावे लागल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काल रात्री जळगावातील अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ देखील एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला आहे.

ओमनी आणि बाईकच्या अपघातात चोपड्याच्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. ७ डिसेंबर रोजी शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तिहेरी अपघाताची ही घटना घडली.

चोपडा येथील सुंदरगढी येथील शुभम पारधी, लोहिया नगर मधील विजय बाळू पाटील आणि शिवाजी नगर मधील एक अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत. टॅक्सी मधील बसलेला प्रवासी ज्ञानेश्वर सोनार रा. सुरत याला डॉ. सुमित सुर्यवंशी यांच्याकडे दाखल करण्यात आलं आहे. तर एकाला धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच इतर जखमींना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *