रायगडमध्ये दोन कारचा समोरासमोर अपघात होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या आठपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहरातील बाजारपेठेलगत एकता पेट्रोल पंपाच्या अलीकडे व मोतीराम प्लाझाच्या समोरील वळणावर दोन कारचा समोरासमोर अपघात होवून आठ जण जखमी झाले आहेत. तर, दोन जण गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या राष्ट्रीय महामार्गावर मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत हजारो जणांचा नाहक बळी गेला आहे. तर हजारो जण जखमी झाले आहेत. असाच एक भयानक अपघात माणगाव बाजारपेठेलगत एकता पेट्रोल पंपाच्या अलीकडे व मोतीराम प्लाझाच्या समोरील वळणावर घडला. हा अपघात एक्सएल सिक्स कार व वॅगनर कार यांच्यामध्ये घडला आहे. या दोन कारमध्ये झालेल्या अपघाताची भीषणता इतकी होती की एक्सएल सिक्स कार व वॅगनर कार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये आठ प्रवासी गंभीररित्या जखमी असून एका सहा वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे. ती किरकोळ जखमी झाली असून दोन्ही वाहनांचे खूप नुकसान झाले आहे. सदर अपघातामधील मुंबईकडे जाणारी वॅगनर कार क्र. एमएच ०१ सीआर ३५५३ व मुंबई बाजूकडून खेडकडे जाणारी मारूती नेक्सा गाडी एक्सएल सिक्स क्र. एमएच ०८ एएक्स ६०६८ या गाड्यांमध्ये हा अपघात घडला.
दोन्ही गाड्यांमध्ये चालकासहित ४-४ असे एकूण ८ प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये मुंबईकडून खेडकडे जाणाऱ्या एक्सएल सिक्स कारमध्ये चालक निलेश जोगळे, प्रवासी महिला अनिता गिल्डा, स्मिता बुटाला, वर्षा चिंडक (सर्व रा. खेड जि. रत्नागिरी) तर गुहागरकडून मुंबईकडे जाणारी वॅगनर कारमधील कुटुंब चालक विकास भागवत, ज्योती भागवत, ऋग्वेद भागवत, चार्वी भागवत (सर्व रा. गुहागर व सध्या रा. मुंबई) अश्या ८ जणांचा समावेश आहे. या अपघातात ८ जण जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले. वॅगनर कारमधील २ जणांची प्रकृती अती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्य आले आहे