शरद पवारांवर जहरी टीका, युगेंद्र पवारांनी पडळकरांना सुनावलं, ते काय म्हणाले ऐकायला वेळ नाही

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली. त्यावर आता युगेंद्र पवार य़ांनी त्यांना सुनावलं आहे.  भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. पडळकर यांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, पडळकर काय बोलले हे मी ऐकले नाही. मी माझ्या कामांमध्ये व्यस्त होतो. बारामतीत आभार दौरे चालू आहेत. त्यामुळे त्यांचे बोलणे ऐकायला वेळ मिळाला नाही. मात्र त्यांच्याकडून आम्ही काही वेगळी अपेक्षा करत नाही. त्यांनी करत असलेली टीका आमच्यासाठी वेगळी नाही. ते सतत काही तरी बोलत असतात. वाईट एवढंच वाटतं की, ते आता महायुतीमध्ये आहेत. आणि एक राष्ट्रवादी महायुतीचा भाग आहे. त्यांनीच त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला पाहिजे. काहीतरी बोललं पाहिजे. शेवटी पवार साहेब एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. एक मोठे नेते आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील लोक त्यांचा आदर करतात. त्यांच्याबद्दल किंवा कोणत्याही जेष्ठ व्यक्तीबाबत असे बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे बोलणे महाराष्ट्राला आवडत नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली.

महाविकास आघाडीचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. अशी चर्चा असून भाजपकडून त्याला दुजोरा मिळत आहे. या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे आमदार त्यांच्या संपर्कात असतील नसतील हे मला माहित नाही. मी सध्या केवळ बारामतीतच लक्ष घातले आहे. मात्र मला वाटत नाही ते त्यांच्या संपर्कात असतील. काही ठराविक लोक चर्चा करत असतील. मात्र चर्चा केली तर त्यात चुकीचं काय..? एकमेकांशी चांगले संबंध ठेवतो म्हणजे लगेच आपण युतीमध्ये जातो असं नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले की, पक्ष फुटीनंतर सर्व निवडणुका या वरून खाली होत आहेत. सुरुवातीला लोकसभा झाली. त्यानंतर विधानसभा त्यानंतर आता नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कारखाने या सर्व निवडणुका आता होऊ घातल्या आहेत. आपल्याला या सर्व निवडणुका ताकतीने लढवाव्या लागतील. कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल. पक्ष संघटन मजबूत करावा लागेल. नवीन लोकांना संधी द्यावी लागेल. स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना, युवकांना, युवतींना संधी द्यावी लागेल. अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्या त्या वेळेला योग्य ते निर्णय घेतले जातील.

शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याच्या प्रश्नावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, तीन पक्षांनी मिळून हे सरकार स्थापन केलं आहे. महायुतीकडे बहुमतही आहे. यामुळेच त्यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी वेळ लागत असेल असे त्यांनी सांगितले. ईव्हीएम बाबत दिल्लीत झालेल्या बैठकीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मी त्या बैठकीत नव्हतो मात्र महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. आज मी दिल्लीला चाललो आहे. त्या बैठकीबाबत काय बोलणे झाले याची माहिती करून घेईल असे ते म्हणाले. सदाभाऊ खोत,गोपीचंद पडळकर हे वारंवार टीका करत असतात अशा वाचाळ वीरांना आवर कधी बसेल या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, एकेकाळी जे आपल्या सोबत होते ते आता महायुतीत आहेत. त्यांनी महायुतीच्या नेत्यांकडे तक्रारी केल्या पाहिजेत की, अशी भाषा आपण सहन करणार नाही. शेवटी विरोधक असो की, आपल्या सोबत असू देत. अशी टीका कोणालाही आवडत नाही. मला एका गोष्टीच आश्चर्य वाटतं की, या विधानसभेच्या निवडणुकीत अशी लोकं निवडून येतात. आणि ज्यांना आम्ही चांगले लोक समजतो जसे की पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, अशोक पवार, बाळासाहेब पाटील अशी लोक निवडून जात नाहीत. आणि वाचाळवीर त्या ठिकाणी निवडून येतात. हे महाराष्ट्रातील चित्र बदललं पाहिजे. असं माझं व्यक्तिगत मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *