‘एचएमपीव्ही’ विषाणू चिंतेचे कारण नाही, नागरिकांनी दक्षता घ्यावी

चीनमध्ये मानवी मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ‘एचएमपीव्ही’चा एकही रुग्ण आढळलेला नाही. चीनमधून आलेल्या या नवीन विषाणुमुळे चिंतेचे कारण नसले तरी, नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी. याप्रकरणी भितीचे वातावरण निर्माण करू नये, महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. ‘एचएमपीव्ही’ हा एक हंगामी रोग आहे. जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरूवातीला उद्भवतो. या अनुषंगाने केंद्राच्या आरोग्य विभागाने 3 जानेवारी रोजी निवेदन प्रसिध्द केले आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये यासंदर्भातील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

नागरिकांनी पुढील बाबी कराव्यात : जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रूमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे, साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत, ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे, भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक अन्न खावे, संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांनी पुढील बाबी करू नये : हस्तांदोलन करू नये, टिश्यू पेपर आणि रूमालाचा पुनर्वापर करू नये, आजारीलोकांशी जवळचा संपर्क टाळावा. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *