ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखकाचे निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख

 मल्याळम भाषेतील साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते एमटी वासुदेवन नायर यांनी वयाच्या ९१व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.मल्याळम भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी एमटी वासुदेवन नायर यांचे बुधवारी केरळमधील कोझिकोड येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.नायर यांच्या निधनानंतर पंतप्रधानांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मल्याळम चित्रपट आणि साहित्यातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक, श्री एमटी वासुदेवन नायर यांच्या निधनाने दु:ख झाले. मानवी भावनांचा सखोल शोध घेऊन त्याच्या कार्याने अनेक पिढ्यांना आकार दिला आहे आणि पुढेही अनेकांना प्रेरणा देत राहील. आवाजहीन आणि उपेक्षित लोकांना त्यांनी आवाज दिला. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रति माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.’

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीदेखील शोक व्यक्त केला. याशिवाय राज्य सरकारने २६ आणि २७ डिसेंबरला दोन दिवसांचा सरकारी दुखवटा जाहीर केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘एमटी वासुदेवन नायर यांच्या निधनाने आपण मल्याळम साहित्याचा एक दिग्गज गमावला आहे, ज्यांनी आपल्या भाषेला जागतिक उंचीवर नेले.’नायर हे मल्याळम भाषेतील महान लेखकांपैकी एक होते. केरळमधून प्रसिद्ध होणाऱ्या ‘मातृभूमी’चे ते संपादकदेखील होते. पद्मभूषण पुरस्कार विजेते एमटी हे मल्याळम साहित्य आणि सिनेमातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांनी दोन्ही क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे. एमटी यांनी पटकथा लेखनासाठी चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले आणि सात चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी इतर ५४ चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या. २०१३ मध्ये त्यांना मल्याळम सिनेमातील कामगिरीबद्दल जे.सी. डॅनियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२२ मध्ये त्यांना केरळ सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच केरळ ज्योती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल एमटी यांना १९९५ साली भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान मानल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पद्मभूषण पुरस्कार विजेते एमटी हे मल्याळम साहित्य आणि चित्रपटातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *