दार उघड दिल्ली, दार उघड…; निमंत्रितांच्या कविसंमेलनात शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा.

 साहित्य संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभामंडपात शनिवारी (दि. २२) निमंत्रितांचे कविसंमेलन रंगले. त्यात राज्यभरातील कवींनी आपल्या निरनिराळ्या विषयांवरील रचना सादर केल्या. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून शेतकरी दिल्लीला धडका मारतो आहे; पण त्याला प्रवेश मिळत नाही. आता तर दिल्लीच्या सीमा अधिक कठोर झाल्या आहेत, अशा शब्दांत कोरडे ओढून कवी इंद्रजित भालेराव यांनी शेतकऱ्यांच्या दु:खाची जाणीव करून दिली. त्यांनी ‘दार उघड दिल्ली, दार उघड’ ही कविता सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली.साहित्य संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभामंडपात शनिवारी (दि. २२) निमंत्रितांचे कविसंमेलन रंगले.

त्यात राज्यभरातील कवींनी आपल्या निरनिराळ्या विषयांवरील रचना सादर केल्या. कवी भालेराव अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, पंचवीस वर्षांपूर्वी शरद जोशींनी याच तालकटोरा स्टेडियममध्ये शेतकरी आंदोलन केले होते. साडेतीनशे वर्षांपासून शेतकऱ्यांचा दिल्लीशी संघर्ष सुरू आहे. मुघलांनाही शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले होते. पंजाबच्या शेतकऱ्यांचे आंदोलन अद्यापही सुरू आहे; पण आता दिल्लीच्या सीमा अधिक कठोर झाल्या असून, त्यासाठीच दिल्लीला ‘दार उघड’ सांगणारी कविता सादर करीत आहे.’संमेलनात शैलजा कारंडे यांनी ‘म्हणूनच हिरकण्या होतात कुणब्याच्या पोरी’ कविता सादर करीत महिलांच्या कर्तृत्वाचा वेध घेतला. नीलम माणगावे यांनी ‘सगळ्याच कविता मूक होत आहेत, शब्दांचे मरण अटळ आहे’ या रचनेतून उपस्थितांना अंतर्मुख केले, तर ज्येष्ठ पत्रकार, कवी मंगेश विश्वासराव यांनी ‘हुकूमशहाला सलाम’ कविता सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली. सिसिलिया कार्व्हालो, नामदेव कोळी, रसिका देशमुख, राजेंद्र सोमवंशी, डॉ. चंद्रकांत पोतदार, किरण डोंगरदिवे, लखनसिंह कटारे, विष्णू सोळंके, व्यंकटेश कुलकर्णी, डॉ. श्रीकांत तारे, पद्मरेखा धनकर, जीवन तळेगावकर, रसिका देशमुख, फेलिक्स डिसुझा आदींनी कविता सादर केल्या.

एकनाथ आव्हाड यांनी संयोजन केले. शशिकला रांजणे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य सभामंडपात बहुभाषिक कविसंमेलन रंगले. त्यात कवींनी देशातील निरनिराळ्या भाषांतील प्रसिद्ध कवितांचे मराठी अनुवाद सादर केले. डॉ. अनुपमा उजगरे अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी पंजाबी कवी सुरजित पातर यांच्या कवितेसह आपली ‘दुःख गोंजरायला मला उसंत नाही’ ही कविता सादर केली. एकनाथ आव्हाड यांनी ‘देऊळ’ ही स्वतःची व कन्नड कवितेचा अनुवाद असलेली ‘नवा भूगोलाचा धडा’ ही कविता सादर केली. याशिवाय डॉ. मंजुषा कुलकर्णी, किरण गायकवाड, आसिफ जरियावाला, स्वाती सुरंगळीकर, गीतेश शिंदे, सुप्रिया घायतडक, सरोज आव्हाट, विष्णू सुरासे, डॉ. अनुश्री वर्तक, अमित भोळे आदींनी संस्कृतपासून मैथिली, बंगाली, उर्दू, कन्नड आदी विविध भाषांतील कवितांचे अनुवाद सादर केले. शुभदा फडणवीस यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *