४५ मिनिटं बंद दाराआड बैठक, धनंजय मुंडेंनी अजितदादांकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा

धनंजय मुंडेंनी अजितदादांकडे मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केल्याची चर्चा रंगली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी रात्री त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. कामकाजाच्या आढाव्याबाबत अजित पवारांची भेट घेतली, बीड घटनेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मुंडे यांनी सांगितले. अजित पवार यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण आलो होतो, असेही ते म्हणाले. परंतु यावेळी धनंजय मुंडेंनी अजितदादांकडे मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केल्याची चर्चा रंगली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तपासानंतर जे काही समोर येईल, त्यावर आम्ही ठरवू. लोकशाहीत आरोप करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार आहेत, असे धनंजय मुंडे यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. धनंजय मुंडेंनी अजितदादांकडे मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केल्याचे बोलले जाते, मात्र अजित पवारांनी राजीनामा स्वीकारलेला नाही. पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे.

आता सर्वांचे लक्ष अजित पवार यांच्याकडे लागले आहे. सोमवारी रात्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर निवासस्थानी गेले होते. त्यामुळे सागर बंगल्यावरील बैठकीत दोघांमध्ये कुठल्या विषयावर बोलणं होतं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.बीड जिल्ह्यात पवनचक्की उभारणाऱ्या आवादा ऊर्जा कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी वसूल केली जात होती, त्याला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी विरोध केला होता. यानंतर ९ डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. खंडणी प्रकरणी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत.भाजप आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. अजित पवार यांनी मात्र मुंडेंचा राजीनामा न घेण्याबाबत ठाम भूमिका घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *